मोबाईल सुरक्षा
- पोलिसांकडे दररोज मोबाईल चोरीच्या असंख्य तक्रारी दाखल होतात. मोबाईल चोर हे सामान्यपणे महिला व ज्येष्ठ नागरिकांना आपली शिकार बनवतात कारण त्यांच्याकडून प्रतिकाराची शक्यता कमी असते. मोबाईल चोरी होण्याचा धोका टाळण्यासाठी सायबर सेलच्या सूचना कायम लक्षात ठेवा.
- रेल्वे प्रवासादरम्यान तुमचा मोबाईल इतरत्र कुठेही ठेवू नका. दरवाजात उभे राहून मोबाईलवर बोलू नका. त्या ठिकाणी मोबाईल हिसकावला जाण्याची सर्वात जास्त शक्यता असते.
- रेल्वे प्रवासदरम्यान मोबाईल सतत तुमच्यासोबत बाळगा. अन्यत्र कुठेही ठेवू नका.
- तुमच्या मोबाईलचा इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटीटी (आयएमईआय) नंबर नोंदवून ठेवा. तुमच्या मोबाईलवर *#06# डायल केल्यास तुम्हाला आयएमईआय नंबर मिळू शकतो. तसेच काही मोबाईलची बॅटरी काढल्यानंतर तेथे आयएमईआय नंबर लिहिलेला आढळतो. या नंबरद्वारे तुमचा मोबाईल शोधून काढण्यास (ट्रॅकिंग) मदत होते.
- तुमच्या मोबाईलची ओळख पटणे सोपे जाण्यासाठी तुमचा मोबाईल तसेच बॅटरीवर तुमचे नाव, पत्ता अथवा अन्य एखादी कायमची खूण करून ठेवा.
- मोबाईल चोरीला गेल्यास तत्काळ पोलिसांना तसेच तुमच्या सिमकार्ड कंपनीला त्याची माहिती द्या. त्यांना तुमच्या मोबाईलची सेवा तत्काळ बंद करण्यास सांगा. तुमचा मोबाईल सापडणे सोपे जावे यासाठी तातडीने तुमचा मोबाईल नंबर, आयएमईआय नंबर आणि अन्य आवश्यक माहिती पोलिसांना द्या.